सुधीर मुनगंटीवारचा विजय क्लियर करून वडेट्टीवार स्वत:च अडचणीत?
बल्हारपूर निर्वाचन क्षेत्राचे भाजपाचे उमेदवार, वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सोबत ब्रम्हपुरीचे आमदार राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची अंतर्गत ‘सेटिंग’ची चर्चा सर्व निवडणूकीत होते. आपल्या राजकीय वजनाचा फायदा घेत, हे दोघेही एकमेकांचे विरोधात कमजोर उमेदवार देवून, स्वत:ची मुंबई तिकिट कन्फर्म करतात. हीच चर्चा आता बल्हारपूर—ब्रम्हपुरी विधानसभेत चर्चील्या जात आहे. या चर्चेत तथ्य किती हे ‘त्या’ दोघानांच ठाऊक, मात्र नेहमी चालणारी चर्चा आताही सुरू झाली आहे. विजय वडेट्टीवार यांनी, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धोक्याची ठरेल अशी बहुजन समाजातील डॉ. अभिलाषा गावतुरे यांना उमेदवारी मिळण्यास अडथळा तयार करून, स्वत:च्या गटातील संतोष रावत यांना उमेदवारी मिळविण्यास पुढाकार घेतला. अखेरपर्यत प्रयत्नाची पराकाष्ठा करीत, रावत यांना उमेदवारीही मिळवून दिली. याच उमेदवारीला डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी, सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात रावतची उमेदवारी ‘डमी’ असल्यांचा आरोप केला. निवडणूकीच्या प्रचारात जनतेत ‘पंजा’ आघाडी घेत नसल्यांने, डॉ. अभिलाषा गावतुरे यांचा ‘डमी’चा आरोपात तथ्य असल्यांचे मतदार आता बोलत आहे. विजय वडेट्टिवार यांचे भुमिकेमुळेच बल्हारपूरात तिरंगी लढत होत असल्यांचा आरोप असून, या तिरंगी लढतीमुळे भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा विजय सोपा झाला आहे.
दुसरीकडे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी संतोष रावत यांना उमेदवारी मिळवून देवून, स्वत:च अडचणीत आले आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे या बहुजन समाजाच्या विशेषत: कुणबी—माळी समाजाचे कॉम्बीनेशन असलेल्या उमेदवारांचा विरोध करून, रावत यांना तिकीट मिळवून दिल्यांने, ब्रम्हपुरी मतदार संघात माळी—कुणबी समाजात विजय वडेट्टीवार यांचे विरोधात रोष निर्माण झाला आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे यांना उमेदवारी न दिल्यास ब्रम्हपुरीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विरोध करू असे ब्रम्हपुरी मतदार संघातील माळी समाजाच्या शिष्टमंडळाने कॉंग्रेसला लेखी निवेदन दिले होते हे येथे उल्लेखनीय! डॉ. अभिलाषा गावतुरे या फुले—शाहू—आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. अशा कार्यकर्त्यांना विजय वडेट्टीवार यांनी स्वत:च्या स्वार्थाकरीता केलेला विरोधामुळे, ब्रम्हपुरी मतदार संघातील दलित—मुस्लीमांतही नाराजीचा सूर आहे.
भाजपाने यावेळी सुधीर ब्रम्हपुरीत उमेदवारी देतांना, सुधीर मुनगंटीवार यांचे मत विचारात न घेता, ब्रम्हपुरी जिंकण्यांच्या हेतुने ‘कुणबी’ कार्ड खेळत, सामान्य कुटूंबातील कृष्णा सहारे यांना रिंगणात उतरविले आहे. ‘आपल्या समाजाचा उमेदवार कोणत्याही पक्षाकडून उभा राहीले तर, समाज म्हणून त्यांचे बाजुने एक रहा’ हा कॉंग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सल्ला ब्रम्हपुरी मतदार संघातील मतदारांना भावला आहे. या समाजाचे विजय वडेट्टीवार यांचे विरोधात ‘एकीकरण’ सुरू झाले आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे विरोधात ‘डमी’ उमेदवार देवून विजय वडेट्टीवार मात्र स्वत:च्या मतदार संघात माळी, कुणबी, दलित, मुस्लीम यांचा विरोध पत्करून घेत असल्यांने, सुधीर मुनगंटीवारचा विजय क्लियर करून वडेट्टीवार स्वत:च अडचणीत आले काय? असा प्रश्न मतदार विचारीत आहे.