म्हणून नौकर भरतीत वय वाढविण्यांचा ठराव!
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकचा भरती घोटाळा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नौकर भरतीच्या जाहीरातीवरून विधानसभेच्या निवडणूकीत आरोप—प्रत्यारोप सुरू आहेत. मागील काही वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची नौकर भरती चर्चेचा विषय ठरली होती. त्यावेळचे कॉंग्रेसचे नेते खासदार बाळू धानोरकर आणि त्यावेळच्या आमदार आणि आताच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत आणि विधानसभेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे नौकर भरती प्रकरण लावून धरले होते. सिबीआय चौकशीची मागणीही केली होती. या नौकर भरतीत घोटाळा आहे अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. एका पदाकरीता 35 ते 40 लाख रूपये एजंट मार्फत देण्यात आल्याचा गंभीर आरोप मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी पत्रकार परिषद घेवून केला आहे.
या बॅंकेत जवळपास 125 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कंत्राटी कर्मचारींने या नौकर भरतीत स्थायी करण्यांकरीता काही संचालक व एजंटनी मोठी रक्कम घेतली. मात्र भरतीची प्रक्रिया पुढे—पुढे गेल्यांने पैसे दिलेल्या उमेदवारांची वयोमर्यादा उलटली. या कंत्राटी कर्मचार्यांनी आपले पैसे परत मागण्याचा तगादा लावला. वयोमर्यादा ओलांडलेल्या कंत्राटी कर्मचार्यांना पैसे परत करण्याऐवजी, पद भरतीसाठी वयोमर्यादा वाढविण्यांचा ठराव घेण्यात आल्याचा आरोप कुकडे यांनी केला. ज्यांचेकडून मोठी रक्कम घेतली अशा उमेदवारांना परिक्षेत पास करता यावे याकरीताच, नौकर भरतीची कंपनीही बदलविण्यात आली याकडे कुकडे यांनी लक्ष वेधले. ज्यांचेकडून 35 ते 40 लाख रूपये घेतले अशांना परिक्षेआधीच प्रश्नपत्रिका पुरविण्याची सोय केलेली असून, याबाबत आपण संबधितांकडे तक्रार नोंदवित असल्यांचे राजु कुकडे यांनी सांगीतले.
नौकर भरतीचा विषय उच्च न्यायालयात सुरू असतांना, आपण टीसीएस मार्फत नौकर भरती प्रक्रिया राबवू असे उच्च न्यायालयाला बॅंकेने शपथपत्रात लिहून दिले. यामुळेच टीसीएस मार्फत नौकर भरतीसाठी हायकोर्टाने आदेश दिले. प्रत्यक्षात मात्र आपल्या मर्जीतील आयटीआय कंपनी मार्फत भरती प्रक्रिया राबवून उच्च न्यायालयाचे आदेशाचा अपमान केल्याचा आरोप कुकडे यांनी केला.